सिंदेवाही (चंद्रपूर): Sindewahi ITI Theft प्रकरणात सिंदेवाही पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शेडमधून लोखंडी साहित्य चोरीचा प्रकार समोर आला. आयटीआयचे भांडारपाल आणि सुरक्षारक्षक यांनी घटनास्थळी पाळत ठेवली होती. २३ सप्टेंबर रोजी पहाटे दोघे शेडमधील लोखंडी खिडकीचे फ्रेम नेताना आढळले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान ५,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. अनिल संतोष भुते (वय ४५ वर्ष) आणि तुळशीराम नारायण मस्के (वय ६० वर्ष, दोघेही रा. लोनवाही, ता. सिंदेवाही) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (चंद्रपुरात शेअर ट्रेडिंग च्या नावाखाली फसवणूक, वाचा फसवेगिरीची हि बातमी)
Sindewahi ITI Theft : चोरीचा प्रकार कसा उघडकीस आला?
मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही येथील शासकीय आयटीआयमध्ये भांडारपाल (स्टोअरकीपर) म्हणून कार्यरत असलेले रविशंकर रामरतन रंधई (वय ३८) यांना २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास सुरक्षारक्षक खोब्रागडे यांनी फोनवरून जुन्या आयटीआय समोरील शेडमधील साहित्याची चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यावरून रंधई यांनी रात्री १०:०० वाजता आयटीआय परिसर गाठून पाहणी केली असता, शेडची जाळी तुटलेल्या अवस्थेत आढळली. तसेच शेडमध्ये ठेवलेले संधाता, जोडारी आणि यांत्रिकी विभागातील लोखंडी स्क्रॅप, लेग व्हाईस असे मौल्यवान साहित्य गहाळ झाल्याचे स्पष्ट झाले.
पाळत ठेवताना दोघे साहित्य नेताना आढळले
या चोरीचा सुगावा लावण्यासाठी दुसऱ्या दिवशी, २३ सप्टेंबर रोजी पहाटे ५:०० वाजताच्या सुमारास भांडारपाल रंधई आणि सुरक्षारक्षक खोब्रागडे यांनी आयटीआय परिसरातील घटनास्थळी छुप्या पद्धतीने पाळत ठेवली. त्यावेळी दोन्ही आरोपी शेडमधील भंगार असलेल्या लोखंडी खिडकीचे फ्रेम चोरून नेत असताना त्यांना दिसून आले. दोघांनी तात्काळ सिंदेवाही पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे अनिल भुते व तुळशीराम मस्के असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस कारवाईदरम्यान आरोपींकडून ३० किलो वजनाचे लोखंडी खिडकीच्या फ्रेमचे तुकडे (किंमत रु. ७५०) आणि शेडमधील इतर लोखंडी भंगार साहित्य (किंमत रु. ५,०००) असा एकूण ५,७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापूर्वीही आयटीआयच्या शेडमधून चोरीला गेलेले लेग व्हाईस आणि इतर स्क्रॅप साहित्य याच आरोपींनी चोरले असावे, असा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. भांडारपाल रविशंकर रंधई यांच्या तक्रारीवरून सिंदेवाही पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दर्शन लटकार करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






