News34 chandrapur
बल्लारपूर – “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” हे भविष्यातील प्रत्येकाचे स्किल्स राहणार आहे आणि हे स्किल्स भविष्यात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण करतील. एआय हे तंत्रज्ञान जग काबीज करेल सोबतच तरुणांना आकर्षित करेल असे मत डॉ. गजेंद्र आसुटकर यांनी व्यक्त केले. ते एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर येथे आयोजित “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते.
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ बल्लारपूर येथे फ्युचर स्किल्स – आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, या व्याख्यानाला मुख्य वक्ता म्हणून डॉ. गजेंद्र आसुटकर, उपप्राचार्य, प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्ञानसंकुलचे संचालक डॉ. राजेश इंगोले, प्रमुख उपस्थिती सहायक कुलसचिव डॉ. बाळू दत्तात्रय राठोड आणि समन्वयक वेदानंद अलमस्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक वेदानंद अलमस्त यांनी केले सोबतच आधुनिक काळात मानव आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्त कामगिरीने भारत जगात आपले नाव उंचावेल अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ता म्हणून लाभलेले डॉ. गजेंद्र आसुटकर यांनी एआय बद्दल सर्व विद्यार्थिनींना अवगत केले सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. येणारे 21 वे शतक हे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे आहे असे लक्षात ठेवले जाईल, कारण तेव्हा ह्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करून अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात. जेव्हापासून मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून एआयने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे.
आज, मशीन्स तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखतात, कार चालवितात, गेम्स खेळतात आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरेच काही चांगले काम करतात असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले आणि भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून जगात अव्वल राहण्याचे काम कस करता येईल यावर भर देण्याचे आवाहन सुध्दा केले. भविष्यात असे नव-नवीन उपक्रम राबविण्याचे आश्वासन सुध्दा दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. अश्विनी वाणी, प्रा. खुशबू जोसेफ, प्रा. श्रुतिका राऊत यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. नेहा गिरडकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.