राज्याला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; महत्त्वाच्या खात्यांना मात्र मुकावं लागलं.

January 31, 2026 by Prakash Hande

First Woman Deputy CM : मुंबई - अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा नवा गटनेता कोण होणार? नवे उपमुख्यमंत्री कोण असणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज राजभवानामध्ये राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत.  त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी देखील त्यांची निवड करण्यात आली आहे. (चंद्रपुरातील हवा प्रदूषित, धक्कादायक आकडेवारी)

सुनेत्रा पवार : समाजकारणातून सत्ताकारणाकडे – एक प्रेरणादायी प्रवास

महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडेच ठळकपणे पुढे आलेले नाव म्हणजे सुनेत्रा पवार. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात १८ ऑक्टोबर १९६३ रोजी जन्मलेल्या सुनेत्रा पवार यांना राजकारणाचा वारसा घरातूनच मिळाला. माजी मंत्री आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच समाजकारण आणि राजकारणाचे संस्कार त्यांच्या जीवनात रुजले.

१९८५ साली त्यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला. अजित पवार सक्रिय राजकारणात असतानाही सुनेत्रा पवार दीर्घकाळ प्रत्यक्ष राजकीय भूमिकेपासून दूर राहिल्या. मात्र बारामती परिसरात शेती, सामाजिक उपक्रम आणि महिलांच्या प्रश्नांवर त्यांचा सहभाग सातत्याने राहिला.

समाजकारणातून घडले नेतृत्व

पर्यावरण आणि स्वच्छतेची विशेष आवड असलेल्या सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे ‘एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे, वृक्षारोपण, ओढा खोलीकरण, महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती असे अनेक उपक्रम राबवण्यात आले. या सर्व कामांमध्ये त्यांची भूमिका केवळ सहभागीची नव्हे, तर नेतृत्व करणारी होती. First Woman Deputy CM

याशिवाय बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी हजारो महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हेच त्यांच्या कार्याचे प्रमुख उद्दिष्ट राहिले.

२०२४ मध्ये राजकारणात थेट प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी प्रत्यक्ष राजकारणात पाऊल ठेवले. अजित पवार यांनी त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत त्यांचा सामना सुप्रिया सुळे यांच्याशी झाला आणि त्यामुळे पवार कुटुंब दोन गटांत विभागले गेले असल्याचे चित्र समोर आले.

या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना ७.३२ लाख मते मिळाली, तर सुनेत्रा पवार यांना ५.७३ लाख मते प्राप्त झाली. तब्बल १.५९ लाख मतांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी मिळवलेली मते ही त्यांच्या राजकीय स्वीकारार्हतेची साक्ष देणारी ठरली.

राज्यसभेतून नवी राजकीय भूमिका

लोकसभेतील पराभवानंतरही सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास थांबला नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांची राज्यसभेसाठी निवड झाली. १३ जून २०२४ रोजी त्यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर त्या खासदार झाल्या.

राज्यसभेतील कामकाजादरम्यान त्यांना तालिका अध्यक्षपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली. देशाच्या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्ष आसनावर बसण्याचा मान मिळणे हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला.

समाजकारणाचा अनुभव, राजकारणातील नवे पर्व

दीर्घकाळ सामाजिक कार्यातून घडलेले नेतृत्व, महिलांसाठी केलेले कार्य आणि बारामतीतील मजबूत जनसंपर्क या जोरावर सुनेत्रा पवार यांनी राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. समाजकारणातून सत्ताकारणाकडे गेलेला त्यांचा हा प्रवास येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती दिशा घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडे खाती कोणती?

शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती सोपवली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवा आणि अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, अर्थमंत्री खातं वगळण्यात आलं आहे. हे खातं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राहणार आहे.

 

Leave a Comment

+